बँकिंगमध्ये क्रांती घडवणारी डिजीटल बँकिंग सेवा


आयुष्याचे प्लानिंग करताना फायनान्शियल प्लानिंग हि अनिवार्य बाब मानली जाते. यासाठी बँक हा अत्याश्यक घटक आहे. पूर्वी धनाढ्य व्यक्ती अथवा सावकाराकडून लोक गरजेच्यावेळी पैसे घ्यायचे व ते व्याजासह परत करायचे. हळूहळू हि व्यवस्था बंद होत गेली आणि त्यांची जागा बँकांनी घेतली. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे सहकारी बँकींग चळवळ खोलवर रुजली आहे. या बँकांनीही राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांच्या तुलनेत अधिक सर्वोत्तम सोयी सुविधा देवून आपला स्वत:चा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. आताच्या काळात बँकेमध्ये असणारी पारंपरिक पद्धती जाऊन डिजिटलायझेशनचे वारे सुरू झाले आहे. ग्र्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे, त्याला हव्या त्याठिकाणी, हव्या त्या वेळेत आणि जलद सेवा द्यावयाची असेल तर डिजीटल बँकिंगशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेक बँका या सोयी सुविधांसाठी मोठा खर्च करीत आहेत. अनेक बँकांनी त्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करून त्यामार्फत आपल्या डिजिटल व्यवस्थेची देखरेख व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देणारी यंत्रणा कार्यरत केली आहे. याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. या डिजिटल प्रणालीमध्ये मोबाईल बँकिंग, एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अलर्ट, पॉस मशीन, पासबुक प्रिंटर, कॅश डिपॉझीट मशिन, क्रेडिट डेबिट कार्डचा वापर इत्यादी डिजिटल सेवा येतात.


तंत्रज्ञानाचा वापर आज प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य बनला आहे. बँकिंग क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. अशावेळी आपली सेवा सर्वोत्तम करण्यासाठी बँकांना पुढाकार घ्यावाच लागेल. भारतातील बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वच बँकांना काळानुरुप बदल अंगिकारण्याचे निर्देश दिले आहेत.सरकारही तेच धोरण राबवत आहे. त्यामुळेच आज बहुतांश बँकांनी आपल्या सेवांमध्ये डिजीटल बँकिंगवर भर देण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे ब्रँचलेस, सिग्नेचर लेस व पेपरलेस बँकिंग प्रत्यक्षात अवतरण्यास मदत होत आहे. आरटीजीएस, आयएमपीएस, ऑनलाईन बँकिंग, टेलिबॅकिंग अशा सुविधांमुळे बँकिंग अधिक सुलभ व जलद झाली आहे. बँकांच्या खर्चात कपात होवून व्यवसाय वृध्दी होत आहे. याशिवाय नवी ग्राहकही बँकेशी जोडले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सुदृढ स्पर्धात्मक वातावरणामुळे त्याचा लाभ ग्राहकांना होत आहे. यातून ग्राहकांनाही चांगले समाधान प्राप्त होताना दिसत आहे.


फिनटेक कंपन्यांचा उदय व नव्या संधी


आजच्या काळात बँकांना आपल्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याबरोबरच ठेवींवर अधिक व्याजदरही द्यायचे आहेत. याशिवाय प्रशासकीय खर्च कमी करतानाच डिजीटल बँकिंग सेवाही द्यायच्या आहेत. अशावेळी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर अनिवार्य बनला आहे. डिजीटल मार्केटिंगसाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणेही आवश्यक बाब बनली आहे. यातूनच फायनान्शियल टेक्नॉलॉजी सेवा देणार्‍या कंपन्यांना मागणी वाढली आहे. आजमितीस अशा कंपन्यांकडून विकसित होणारे ऍप्स, सेवा बँका व ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात संशोधन करून अशा सेवा उपलब्ध करून दिल्यास चांगला स्टार्ट अप मिळू शकतो. 2020 पासून ङ्गनॅसकॉमममार्फत प्रचंड मोठ्या व्यवसायाच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध होतील. अलिबाबाची गुहाच जणू संधीच्या शोधात असलेल्यांसाठी उघडणार आहे.


मोबाईल बँकिंगमुळे बँक प्रत्येकाच्या खिशात

बँकेच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना आपल्याकडील मोबाईलचा वापर करता येवू लागले आहेत. आपल्या खात्यातील बॅलन्स पाहणे, पैसे पाठवणे, बील पेमेंटस अशा अनेक गोष्टी आपण बँकेत प्रत्यक्ष न जाताही करू शकतो. सध्या ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल बँकिंगची सुरक्षितता पाहिली जाते. भविष्यात व्हाईस एनेबलड पेमेंट सेवा मिळण्याची शक्यता असल्याने हे व्यवहार अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. घरांमधील टि.व्ही., सुरक्षा यंत्रणा अशा अनेक गोष्टींच्या वापरातही हे तंत्रज्ञान क्रांती घडवत आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आय.ओ.टी.) संकल्पना आज डिजीटल क्षेत्रात प्रत्यक्ष अवतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कामे सहजसोपी व एका बटणावर होणे शक्य होणार आहे. एकूणच मानवी जीवन अधिकाधिक सहजसोपे करण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत आहेत. अनेक बँका आयओटी तंत्रज्ञान आपल्या सेवेत आणण्यासाठी पावले उचलत आहेत.


युपीआय पेमेंट सिस्टिम

युपीआय हि सर्वात जलद व सुरक्षित पेमेंट प्रणाली म्हणून उदयास आली आहे. एनपीसीआयने विकसित केलेली हि सिस्टिम पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली चालवली जाते. त्यामुळे बँकेचे व्यवहार चोवीस तास व वर्षाचे 365 दिवस करता येणे शक्य झाले आहे. एकूणच युपीआय हे बँकिंग क्षेत्रातील अर्थक्रांतीच बनले आहे. आजमितीस भारतात युपीआय आधारित 39 मोबाईल ऍप्स कार्यरत असून सुमारे 50 बँका हि सेवा देत आहेत. नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या रोकड रकमेच्या समस्येवेळी युपीआय ऍपने व्यवहार सुरळीत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. केंद्र सरकारनेही स्वत: भीम ऍप विकसित करून अधिकाधिक लोकांपर्यंत या माध्यमाची उपयुक्तता पोहचवली.


डिजीटल बँकिंग सर्वाधिक सुरक्षित करणारे ब्लॉकचेन

बँकिंग व्यवहाराचे डिजीटायलेशन सुरु झाल्यावर या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांची सुरक्षितिताही महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठीच ब्लॉक चेन यंत्रणा आता अस्तित्वात येत आहे. अकाउंट हॅकिंगसारख्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ब्लॉक चेन अद्भुत चमत्कार ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बँकांच्या डेटा अधिक सुरक्षित बनत चालला आहे. रिझर्व्ह बँकेसह अनेक बड्या बँका आपल्या कामकाजात ब्लॉक चेन यंत्रणा कार्यान्वीत करीत आहेत. यातून अनहॅकेबल डेटा बेस तयार होवून डिजीटल व्यवहारांबाबत बँकांसह सर्वसामान्यांच्या मनात असलेली भिती दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. फ्रॉड कमी होवून व्यवहारातील पारदर्शकता वाढेल तसेच मानवी हस्तक्षेपास वाव कमी असल्याने सेवा अधिक गतिमानही होईल. याशिवाय बायोमेट्रिक्सचा वापरही डिजीटल बँकिंगमधील फ्रॉड नियंत्रणात आणण्याचे काम करीत आहे.


क्लाऊड बँकींग

डिजीटल तंत्रज्ञानामुळे माहितीचा प्रचंड साठा (डेटा) जमा होत आहे. हा डेटा सुरक्षितरित्या जतन करणे व त्याचा उपयोग करून डिजीटल बँकिंगच्या सेवा देणे अत्यावश्यक असते. यासाठी क्लाऊड तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. काही मोठ्या कंपन्यांनी क्लाऊड यंत्रणा तयार करून याठिकाणी डेटा स्टोरेज व त्यावर आधारित तांत्रिक सेवा, ऍप्लिकेशनची निर्मिती केली आहे. एखादी बँक या क्लाऊड बँकिंगचा लाभ घेवून स्वत:चा डेटा सुरक्षित ठेवण्याबरोबरच ग्राहकांना नवीन डिजीटल सेवा सहजरित्या देवू शकते. यातून बँकांची कार्यक्षमता अधिक वाढण्याबरोबरच जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्यास मदत होत आहे. अनेक बँका क्लाऊड आधारित डिजीटल सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत व याची मागणी सातत्याने वाढत आहे. डेटा साठविण्यासाठी बँकांना करावा लागणारा हार्डवेअरवरील अवाढव्य खर्च कमी होतो तसेच त्यासाठी मनुष्यबळ, यंत्रणा उभारणीसाठीच्या खर्चातही बचत होते. याशिवाय अनेक डिजीटल बँकिंग सेवा क्लाउडशी थेट जोडल्याने वेळोवेळी त्या अपडेट करणेही सहज शक्य होते.


डिजीटल मार्केटिंग

आजच्या स्पर्धेच्या काळात बँकांना प्रभावीपणे आपली सेवा, योजना लोकांपर्यंत पोहचवता आल्या पाहिजे. त्यासाठी डिजीटल माकेटिंगचा चपखल वापर गरजेचा आहे. सध्या सोशल मिडियावरील फेसबुक, इन्स्ट्राग्राम, व्टिटर, लिंकेडन सारख्या माध्यमांचा बोलबाला आहे. या माध्यमातूनही बँक व आधुनिक डिजीटल बँकिंग सेवांची समग्र माहिती लोकांपर्यंत पोहचल्यास आणखी ग्राहक आकर्षित होवू शकतात.


भविष्यातील अपेक्षित बदल...

डिजीटल बँकिंगची प्रक्रिया खूप वेगाने पुढे जात आहे. कृत्रिम बुध्दमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए.आय.) आणि बिझनेस ऍनालिटक्समध्ये मोठ्या बदलांची क्षमता आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता असलेले रोबोटिक्स तंत्रज्ञान भविष्यात बँकिंग क्षेत्रात गेमचेंजर ठरू शकते. आताच अनेक खासगी बँका ग्राहकांना सेवा देण्यासाठी रोबोटचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय कर्ज मंजुरी प्रक्रिया, गुंतवणुक सल्ल्यासाठीही ए.आय.ची मदत घेतली जावू शकते. या गोष्टीमुळे बँकेच्या कार्यक्षमतेत वेगाने वृध्दी होवून बँकांच्या प्रशासकीय खर्चात मोठी कपात होवू शकते. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे डिजीटल बँकिंग हाच बँकिंग क्षेत्राचा मजबूत आधारस्तंभ ठरणार आहे.

डिजीटल बँकिंगच्या रुपाने बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. हा बदल वेगाने सर्वच बँकांना अंगिकारावा लागणार आहे. मी स्वत: अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेचा चेअरमन म्हणून हे बदल बँकेत करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. मर्चंटस्‌ बँकेने डिजीटल बँकिंग सेवांचा विस्तार करताना नुकतीच स्वत:ची क्यु आर कोड पेमेंट प्रणाली सुरु केली आहे. त्याला मिळत असलेला ग्राहकांचा प्रतिसाद खूपच प्रोत्साहन देणारा ठरत आहे. बँकेचे संस्थापक चेअरमन व ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत यांचे मार्गदर्शन व सहकारी संचालक यांच्या एकत्रित प्रयत्नातून मर्चंटस्‌ बँकेला पूर्णत: डिजीटल बँक करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.


सी.ए.अजय मुथा
चेअरमन, अहमदनगर मर्चंटस्‌ बँक
माजी चेअरमन, आयसीआयए, नगर शाखा